( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे)
राजवाडा परिसर हा आटपाडी पेठेच्या आर्थिक स्थैर्याचे मुख्य केंद्र बनवा आणि मुळ आटपाडीच्या मुळावर उठलेल्या समस्या, प्रश्नांसह वेळीच दुर करा . असे आवाहन आटपाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे . स्वातंत्र्यावेळची आटपाडी आणि स्वातंत्र्यानंतरच्या पंचाहत्तरीतली आटपाडी, या दरम्यानच्या आटपाडी मध्ये विकासात्मक प्रचंड बदल झाला आहे . मात्र या विकासाची सर्वात मोठी झळ, मुळ आटपाडीवर अवकळा आणणारी ठरत असल्याने मुळचे आटपाडीकर पेठकरी, व्यापारी, नागरीक सर्वच बाजुनी निराशेच्या गर्तेत फेकले गेले आहेत . फक्त पैसा अन पैसा, करोडोंच्या राशीतला प्रचंड पैसा मिळविण्याच्या नादाला लागलेल्या अनेक राजकारण्यांना या मुळच्या आटपाडीशी काही देणे घेणे उरलेले नाही. असेच राहून राहून वाटते आहे . मुळ आटपाडीतील अनेक सार्वजनिक व्यवस्था मापटेमळा, धांडोरमळा, पंचायत समिती परिसर, एम.एस.ई.बी लगतच्या शासकीय गोडावूनच्या जागी, अथवा कारखाना रोड लगतच्या शासकीय जागांवर नेण्याचा काही जणांचा प्रयत्न असल्याच्या कथित चर्चेवर भाष्य करताना सादिक खाटीक यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे .
अनेक वस्त्या, वाड्या, मळ्यांसहचे मुळ गाव असलेली आटपाडी, १० किलोमीटर परिघापर्यत असित्वात होती, तथापि आटपाडी एस . टी . स्टॅन्ड पासून आटपाडी पोलीस स्टेशन पर्यतचा परिसर मुळच्या आटपाडीत गणला जातो . त्यातही एस . टी . स्टॅन्ड ते आटपाडीच्या ओढापात्रा लगतचे बाजार पटांगण या दरम्यानच्या गावालाच मुळ आटपाडी म्हणत .
स्वातंत्र्यापूर्वी आटपाडीला महालाचा दर्जा होता आणि आटपाडीत १९३७ साली म्युनिसिपल ( नगरपालीका ) असल्याचा उल्लेख आजच्या आटपाडी नगरपंचायत कार्यालयाच्या दर्शनी चौकटीवर दगडावर कोरलेला आढळतो. अशा ऐतिहासीक महती असणाऱ्या मुळच्या आटपाडीची सर्वांगीण व चौफेर विकासाची पहाट कधी उजडलीच नाही . गल्ली बोळातल्या पाऊल वाटापासून मुख्य रस्त्या पर्यतची व्यवस्था अनास्थेतच राहिल्याने विकासापासून मानवी मनापर्यत सर्वच काही आकसल्या सारखे झाले आहे . पुर्वीच्या काळी एखादी दुसरी जीप , ट्रक , ट्रॅक्टर, दोन चार मोटार सायकली, पाच दहा बैलगाड्या, पाच पंचवीस सायकली, शंभरभर विद्यार्थी, शे – दोनसे माणसे, एवढ्या वर्दळीने गाव गजबजलेले असायचे . आटपाडीच्या ओढापात्रात भरणाऱ्या शेळ्या – मेंढ्याच्या बाजाराने मुळच्या आटपाडीला सजलेल्या नवरीचे रूप यायचे . बाजार पटांगण ते ओढा पात्रातल्या, भाजीपाल्या पासून शेकडो वस्तु, पदार्थांचा, औजारे, उपकरणे, कपडे, लत्ते, शेती उपयोगी सर्व बाबी वगैरेच्या शेकडो दुकानांनी आटपाडीचा सजलेला शनिवाराचा आठवडा बाजारही, उत्कंठावर्धक मॅचच्या ग्राउंड सारखा गजबजलेला भाग भासायचा . आठवडा बाजारात शेळ्या, मेंढ्या, बोकडांच्या विक्रीनंतर गावी जाताना प्रत्येक जण आटपाडीच्या बाजार पेठेतल्या दुकानातून पाच दहा हजारांची खरेदी करूनच त्यांच्या गावी जायचा . त्यामुळे शनिवारी होणारी प्रचंड उलाढाल पेठकऱ्यांना आठवडाभराची रसद पुरवुन जायची .
तथापि आदेश, नियम, मनातले मनसुबे, प्लॉटिंग मधून पैशाची निर्माण झालेली मोठी अभिलाषा, यातुन अनेक नियमासुरांनी मुळच्या आटपाडीच्या या व्यवस्थेलाच प्रथमतः सुरुंग लावलाआजच्या घडीला आटपाडी पेठेतून उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, एम . एस . ई . बी . व इतर अनेक कार्यालये शाळा महाविद्यालयांकडे प्रतिदिनि जाणाऱ्या येणाऱ्यांचा प्रचंड लोंढा वाढला आहे . शेकडो दुचाकी, चारचाकी वाहतूकीच्या वर्दळीने, पेठ ठप्प बनते आहे . या मुळ आटपाडीच्या पेठेत विविध दुकानांसमोर किमान शंभर भर मोटार सायकली लावलेल्या आढळतील . यासाठी प्रशस्त रस्ता निर्मिती, पेठेतल्या काही सार्वजनिक ठिकाणी पार्किंग व्यवस्था, यावर कोणीच काही करण्यासाठी पुढे सरसावले नाही . हे दुर्दैव मुळ आटपाडीच्या अनास्थेला एक कारण ठरले आहे .
मध्यवर्ती ठिकाणचा जुनी कचेरी, सरकारवाडा म्हणून संबोधला जाणारा राजवाडा परिसर, मुळच्या आटपाडीचा आत्मा असणारा भाग आहे . साधारणतः ३८ गुंठे क्षेत्रापैकी पोस्टाला वर्ग झालेली जागा वगळता उर्वरीत सर्व भाग महाराष्ट्र शासन म्हणून शासन दप्तरी नमुद आहे . तथापि या ठिकाणचे *सह दुय्यम निबंधक कार्यालय, आटपाडीसह, आटपाडी तालुक्यातील अनेक गावचे तलाठी, विविध सजांचे सर्कल याच परिसरात कार्यरत असायचे .तथापि तहसीलदारांच्या निवासस्थानासह इतर शासकीय व्यवस्थांचे हे मध्यवर्ती ठिकाण, दशकापूर्वी तहसील कार्यालय परिसरात नेल्याने या राजवाडा परिसराला भग्नावस्थेतल्या , कोंडवाड्याचे दुर्देवी स्वरूप आले आहे. याच राजवाडा परिसरातल्या पोस्ट ऑफीसला लागून, तळघरातल्या प्रशस्त अपुऱ्या बांधकामावरील उघड्या तळमजल्यावर माऊलींच्या ज्ञानेश्वरीची पारायणे घेतली जातात. लहानांचे क्रीडाप्रकार, प्रबोधन करणारे उपक्रम राबविले जातात.
या जागेपासून फर्लांगभर अंतरावरच आटपाडीच्या उच्चशिक्षीत माजी सरपंच, आटपाडी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ . विद्याताई विजयराव देशपांडे यांच्या बंगल्याच्या आवारातच श्री . साईबाबांचे अत्यंत पवित्र असे मंदिर आहे . श्री . कल्लेश्वर मंदिराचा परिसरही श्री . साईमंदिरापासून फर्लांगभरावर आहे . चार फर्लांगावर बहुतांश उच्चभ्रु बांधवांचा या परिसरात रहिवास आहे . धक्कादायक दुर्दैवाची एक बाब म्हणजे राजवाडा परिसरातल्या या पडीक बांधकामाच्या तळघरात आसपासच्या लोकांनी टाकलेल्या केर कचऱ्यांच्या ढीगांनी तळघर व्यापू लागले आहेच शिवाय प्रचंड दुर्गंर्धीने परिसरातले आरोग्यही धोक्यात आले आहे . या विषयी कोणी ब्र ही काढत नाही . शहरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या अनेक वेळा गल्ली, बोळ, शहरातून येरझाऱ्या करीत कचरा गोळा करीत असतात . या पार्श्वभूमीवर त्या तळघरातल्या केरकचऱ्या विषयीची अनास्था चिंतनीय आहे . या ठिकाणा लगतच्या मोकळ्या जागेवर, उघड्यावर लघुशंका करणारेही कमी नाहीत . हे अपूरे बांधकाम गेली ३५ – ४० वर्षे अपुर्णावस्थेत आहे .
याची ना शासनकर्त्यानी तमा बाळगली . ना राजकारण्यांना आस्था वाटली . मुळ आटपाडीच्या मध्यवर्ती ठिकाणची ही करोडो रुपये किंमतीची राजवाड्याची प्रचंड जागा आपल्याला मिळवता येईल का ? अशी स्वप्ने राजकारण, समाजकारणातल्या कांहींना पडू लागली आहेत . गत दशकापासून बंद पडलेल्या या परिसराला गवत, वेली, झाडा झुडपांनी घेरले आहे . अत्यंत घातक, विषारी, सरपटणाऱ्या जीवांचा येथील वावरही एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. याचेही भान कोणाला नाही . या परिसरात गजबज वाढविणारी व्यवस्था साकारावी, असे कोणालाच वाटले नाही . वास्तवीक या मध्यवर्ती ठिकाणच्या पोस्टासह एकर भराच्या जागेत एखादी मोठी प्रशासकीय व्यवस्था, अथवा एखादे भव्य स्मारक अथवा सार्वजनिक उपयोगाचे भव्य दालन उभे केल्यास या परिसराला, मुख्य पेठेच्या आर्थीक परिवर्तनाचे – मोठ्या केंद्राचे स्वरूप येईल, आणि हा बदल, मुळ आटपाडीच्या हृदया समान असलेल्या परिसराला नव संजीवनी देईल, यासाठी कोणी काही करताना आढळत नाही . सरकार वाड्याच्या बेसमेंट ( तळघर ) मध्ये पन्नासभर व्यावसायीक गाळे, संपुर्ण ग्राऊंड फ्लोअरवर ( तळमजला ) वाहन पार्किंग आणि फर्स्ट फ्लोअर ( पहिला मजला ), सेकंड फ्लोअर ( दुसरा मजला ), आणि थर्ड फ्लोअर ( तिसरा मजला ) अशा चौमजली रचनेत नगरपंचायत सारख्या संपूर्ण प्रशासन व्यवस्था साकरल्या गेल्यास मुळच्या आटपाडीच्या मुख्य बाजार पेठेच्या वैभवात प्रचंड भर पडू शकते. सांगलीच्या राजवाडा चौकात दिवंगत माजी मंत्री डॉ . पतंगराव कदम साहेबांनी साकारलेले बहुउद्देशीय, विविधांगी भारती भवन सारखेच बहुउद्देशीय भवन या जागेला प्रचंड स्थान महात्म निर्माण करेल .
किंवा किमान एक हजार महिलांना या परिसरातल्या संभाव्य दालनात, कुटिरोद्योग, ग्रामोद्योग, बचत गटांचे माध्यमातून केले जाणारे उद्योग, बांबुपासून बनविल्या जाणाऱ्या १५०० पेक्षा जास्त वस्तू, पदार्थ, उपकरणांचे निर्मिती केंद्र साकारल्यास ते सोने पे सुहागा ठरेल. आटपाडी एस . टी . स्टॅन्ड ते बाजार पटांगण पर्यतचा रस्ता ५० फुटी केला जावा . सांगोला चौक, तांबडा मारूती मंदिर, डॉ . बापट दवाखाना ते सरकार वाड्यातली जुनी चावडी, हा एक वाहन जाणारा रस्ताही, ५० फुटी केला जावा आणि सरकार वाडाच्या दोन्ही बाजूपैकी एखाद्या बाजुने ओढा पात्रात जाणारा नवीन ५० फुटी रस्ता अस्तित्वात आणल्यास मुळ आटपाडी सर्वार्थांने सावरल्याशिवाय राहणार नाही. या नवव्यवस्थेच्या जोडीला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त होणाऱ्या जागेत नगरपंचायत मुख्यालय, लगतच्या खादी भांडार परिसरातही प्रचंड परिवर्तनाचे विकास केंद्र मुळच्या आटपाडीसाठी साकारणे अति अत्यावश्यक बनले आहे .
आटपाडी – भिवघाट रस्त्यावरील साईबाबा चौकाची पश्चिम बाजु ते अंबामाता मंदिर तेथून वळसा घेत सांगोल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पर्यतच्या ओढापात्रातील दुतर्फाची सर्व अतिक्रमणे सत्वर काढणे महत्वाचे आहे . शे – दीडशे वर्षापासून आटपाडीच्या तिन्ही बाजुंनी गावाला दगडी तटबंदी होती . ७ फुट रुंदीची आणि अंदाजे एक किमी लांबीच्या या मोठ्या भिंतीवर अनेक ठिकाणी प्रचंड मोठे बुरुजही होते . या ७ फुट रुंदीच्या गावच्या संरक्षक भिंतीच्या आतच अनेकांच्या खाजगी मालमत्ता होत्या .
मात्र आजचे ओढ्यातील चित्र पाहता, ती ७ फुट रुंदीची प्रचंड भिंत ओलांडून अनेकांनी चक्क ओढापात्रात शंभर दीडशे फुटापर्यंत अतिक्रमणांचा धडाका लावत, गावचा ओढाच गिळंकृत करण्याची स्पर्धा सुरू केली आहे . ओढ्याच्या दुसऱ्या बाजुंनेही आपल्या क्षेत्राच्या पुढे जागा वाढवून ती व्यापण्याचा प्रकारही अनेक ठिकाणी सुरु आहे . ही सर्व अतिक्रमणे तातडीने काढून टाकली पाहिजेत . आणि ओढापात्रात दोन्ही बाजुंनी रस्ते सोडत, नवीन संरक्षण भिंतीच्या माध्यमातून संपूर्ण ओढा पात्र गावच्या संवर्धानासाठी उपयोगात आणले पाहिजे . सरकार वाडाच्या दोन्ही बाजु ते गावचा ओढा अशा दोन पैकी एका नव्या ५० फुटी प्रशस्त रस्त्याद्वारे आटपाडीच्या वाहतुकीचा कोंडला जाणारा श्वास मोकळा केला पाहीजे . ओढा पात्रात दोन्ही बाजुंनी चिंचबन, ऑक्सीजन पार्क, पुढच्या मोकळ्या प्रचंड जागेत बाजार पटांगण ते साई मंदिर परिसरापर्यंत, शनिवारचा शेळ्या – मेंढ्याच्या बाजारासह व इतर दिवशीचाही सर्व बाजार या ओढापात्रातच, मधून १०० फुटाचा रस्ता निर्माण करत अस्तित्वात आणला पाहीजे . बाजारात येणाऱ्या शेतकरी, व्यापारी , इतर व्यावसायीक यांचेकडून या पुढच्या १० वर्षात कसलाही टॅक्स अथवा जागा भाडे घेऊ नये . बाजारकऱ्यांना संरक्षण देण्याबरोबरच कर माफीच्या सवलतीचे सहाय्य करावे .
तसेच मार्केट कमिटीनेही शेळ्या मेंढ्याचा बाजारही अंबामाता मंदिरा लगतच्या ओढा पात्रात आणावा . आणि किमान एक पंचवार्षीक तरी आटपाडीच्या बाजारातला शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीच्या वर आकारला जाणारा टॅक्स पुर्णतः माफ करावा . ज्यामुळे, कसलीही पावतीच होणार नसल्याने, हा बाजार यार्डातच भरविण्याच्या अनाठायी सक्तीतुन मुक्ती मिळेल . आणि आटपाडीचा हा शनिवारचा सर्वच बाजार, सर्वांच्या सोयी सवलतीचा व सर्वात मोठा म्हणून राज्यात ओळखला जाईल . शिवाय भ्रष्टाचारालाही मोठा पायबंद बसेल . यादृष्टीने नगरपंचायत आणि मार्केट कमेटीने सकारात्मक पावले टाकावीत .
आटपाडी च्या ओढातल्या मुळच्या फरशी पुलापासून धांडोर ओढ्या पर्यंतच्या राजमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या अनेक शासकीय जागा अनेकांनी ढापल्या आहेत . शिवाय या रस्त्या लगतच्या, शासनाच्या परवानगी विना देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जागेवर आपले साम्राज उभे करणारांचेही साम्राज्य खालसा करून या सर्व शासकीय जागा सर्व सामान्यांच्या विकासासाठी उपयोगात आणल्या पाहिजेत . मुळ आटपाडी शहरातल्या अनेक अतिक्रमणांवर तातडीने जेसीबी चालवला पाहीजे . रस्ते व इतर सोपस्करांसाठी आटपाडीकरांच्या अधिग्रहण कराव्या लागणाऱ्या जागांचा परतावा राष्ट्रीय महामार्गाला घेतल्या जमिनीच्या दराने संबंधीत नुकसान ग्रस्तांना दिला गेला पाहिजे. असाही आग्रह सादिक खाटीक यांनी शासनकर्त्याकडे धरला आहे .