( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
विटे नगरपपालिका निवडणुकीसाठी अद्याप बराच कालावधी असला तरी राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. पालिका निवडणूक अनुषंगाने प्रमुख तीन गट मानले जातात. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील गट, आमदार सुहास बाबर गट व अशोक गायकवाड गट हे ते तीन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत अशोक गटाची वेगळीच खेळी असते. वर्षभर राजकारणात शांत असलेले अशोक गायकवाड अचानक जागृत होतात. कोणाला पाठींबा द्यायचा याचा त्यांना अचानक साक्षात्कार होतो. कार्यक्रमाचे औचित्य साधून ते स्टॅण्टबाजी करत असतात. याही वेळी अपेक्षे प्रमाणे त्यांनी नेहमी सारखी स्टॅण्टबाजी केली. पत्रकारांचा एक गट त्यांची बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. पाटील की बाबर यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा याचे त्यांचे गणित ठरलेले असते. सर्वच नेते सत्ता मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. साधारणपणे दिवाळी दरम्यान पालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चौकात नेत्यांची बसण्याची ठिकाणे देखील ठराविक आहेत. सध्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु आहे. छुप्या गाठी भेटी सुरु आहेत. प्रत्येकजण सत्ता प्राप्त करण्याचा अभिनिवेश बाळगून आहे. नव्या चेहऱ्यांना अधिकतर संधी मिळेल असे सध्याचे तरी चित्र आहे. सबल इच्छुक कार्यकर्ते सकाळ सायंकाळ चहा पानाचा खर्च करत आहेत. फुकटे कार्यकर्ते चौकात बसून त्यावर येथेच्छ ताव मारत आहेत.मुख्य चौकात एक गट त्याच्याच प्रतीक्षेत असतो.
घोडे मैदान अजून खूप दूर आहे. वादळा पूर्वीची ही शांतता आहे. पुरुष कार्यकर्त्यांची जशी एक फळी कार्यरत आहे. तशी महिला कार्यकर्त्यांची एक फळी देखील कार्यरत आहे. स्वयंघोषित उमेदवारी जाहीर केली जात आहे. कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून नेते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुके घेऊन जात आहेत. कार्यकर्ते तुमच्या दारीं हे चित्र बदलून नेते तुमच्या दारीं हे चित्र पहावयास मिळत आहे.