ता.९
शेतकऱ्यांना कोणतीही जात नाही शेतकरी हीच एकमेव जात आहे.मात्र विद्यमान राजकारण जात आणि धर्म यावरच चालू आहे, म्हणून मी फक्त शेतकऱ्यांसाठीच लढतो,”असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री बच्छू कडू यांनी केले. ते येथून जवळच असलेल्या दरेगाव येथे प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून शेतकरी प्रहार संघटनेच्या माध्यमातून ८ मे रोजी दरेगाव येथे कर्जमाफी आंदोलनासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माजीमंत्री बच्छू कडू यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्याला शेतकरी संघर्ष योध्दा ज्ञानेश्वर खरात पाटील , बालाजी सोसे, गजानन जायभाये , प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते गजानन लोखंडकार , शेतकरी संघटनेचे अमोल तुपकर , प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष अदित्य तिवारी , हरिश जैस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बच्चू कडू म्हणाले की,
आजचे राजकारण हे जात , धर्म या चार भिंतीच्या आतच चालू आहे . शेतकऱ्यांना जात , धर्म नसतो, तो जगाचा पोशिंदा आहे . पण तोच उपाशी राहत असेल तर त्यांच्यासाठी कोण लढणार ? त्यांना कर्ज माफी कोण देणार ? यासाठी आपण प्रहार जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माजीमंत्री बच्चू कडू यांनी दरेगाव येथील शेतकरी मेळाव्यात दिला .
कैलास नागरे हा शेतकऱ्यांसाठी लढता लढता मेला नाही तर तो शेतकऱ्यांसाठी शहीद झाला आहे . तो कोणत्या जातीचा आहे हे लक्षात न ठेवता तो १४ गावातल्या शेतकऱ्यांना हक्काचे खडकपूर्णा धरणाचे पाणी मिळावे म्हणून लढला व शहिद झाला . आपण एकाही गावात शहीद कैलास नागरे यांचे बलिदानाचा बॅनर लावले नाही याबद्दल खेद वाटतो. ही आपली शोकांतिका आहे . आपण जात , धर्म यातच गुरफटून गेलो . शेतकरी सर्व जातीत जन्माला आला आहे . त्याला जात नाही . म्हणून कोणी विचारत नाही . शेतकरी आक्रमक झाला तर एका दिवसात सत्ता पालट करण्याची ताकद त्यांच्यात आहे . बटेंगे तो कटेंगे यावर आपले मत गेलं . आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचे आश्वासन ज्यांनी दिलं ते गुपचूप झाले . अजित पवार म्हणतात मी बोललो नाही . मग शेतकऱ्यांना कर्ज माफी मागावी कोणाकडे !
घरकुल योजना आली , सव्वा लाखांत घर कसं बांधायचं , आमदार यांचे पगार ५० हजारावरुन २ लाख ५० हजार झाले . शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून लढतात , संघटीत होऊन त्यांनी माजी मंत्री रणजीत पाटील यांना पाडलं ,आ.धीरज लिंगाडे यांना निवडून आणलं . आपण संघटीत होऊन शेतकरी जगेल यासाठी लढा द्यायचा आहे . प्रत्येक मंत्र्याच्या बंगल्यासमोर जाऊन संपूर्ण कर्ज माफीचे आंदोलन करायचे आहे . त्यासाठी आपला हा लढा आहे . यावेळी शेतकरी यौध्दा ज्ञानेश्वर खरात आणि बालू सोसे यांनी आपली आंदोलनाची दिशा स्पष्ट केली . ६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्यासमोर आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन आत्माराम गाडे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते .