तालुका प्रतिनिधी – जनार्दन हाटकर | नांदेड
नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी व पारदर्शकता वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी ठाम मागणी हदगाव मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे तालुकाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष (आरटीआर) लक्ष्मणराव शिंदे नेवरीकर यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी नांदेड, तहसीलदार हदगाव आणि गटविकास अधिकारी हदगाव यांना लेखी निवेदन दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती मोठा महसूल उत्पन्न करतात, मात्र त्याचवेळी ग्रामपंचायत बैठकीदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणले.
त्यांच्या मते, “ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य व्हावे. जर काही कारणास्तव एखाद्या ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही बसविणे शक्य नसेल, तर बैठकीदरम्यान अँड्रॉइड मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याची नोंद कार्यालयात संग्रहित केली जावी,” अशी सक्त सूचना शासनाने द्यावी.
शिंदे यांनी गेल्या महिनाभर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना लेखी कळविण्यात आले असून, “आपल्या मागणीवर योग्य विचार करून लवकरच आदेश जारी केले जातील” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या मागणीवर आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले असून, ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.