(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
माजी आमदार सदाशिराव पाटील व त्यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी अखेर कमळ हाती घेतले. खानापूर मतदार संघाच्या व विटे शहराचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजप प्रवेश करत असल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी जाहीर केले. आज सकाळी भाजपच्या प्रदेश कार्यालयात अनेकांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विट्यात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.
पाटील पिता पुत्रानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापना दिना दिवशीच रामराम ठोकून एक प्रकारचा धक्काच दिला. योग्य वेळी योग्य निर्णय ही पाटील गटाची राजकारणातील खासियत आहे. आलेल्या संधीचा कसा उपयोग करून घ्यायचा याचे ज्ञान त्यांच्याइतके कोणालाच अवगत नसेल.
आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी कमळ हाती घेण्याच्या निर्णय घेतला आहे. आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम होत आहे. विटा पालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातो. त्यामुळे राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार आहेत. बदलत्या समीकरणाचा फायदा ते कितपत उचलतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश मिळवता आले नव्हते. विरोधक म्हणून काम करताना त्यांना अनेक अडथळे पार करावे लागले. त्यांचे कार्यकर्ते देखील अस्वस्थ होते. त्यांनी कार्यकर्ते यांची मते अजमावली. मगच हा निर्णय घेतला.