दहिवडी प्रतिनिधी – जोतिराम काटकर
मार्डी गावापासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बागवस्ती, सावंतवस्ती, पोळवस्ती व घाडगेवस्ती यांच्यासाठी जाणारा रस्ता अद्यापही डांबरीकरणाअभावी खड्डे व चिखलमय अवस्थेत आहे. अनेक वर्षांपासून विकासाची ग्वाही देणारे लोकप्रतिनिधी या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याची ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“निवडणुकीत वल्गना करणारे नेते निवडणूक संपताच गायब होतात. एवढ्या जवळच्या वस्तीसाठी देखील पक्का रस्ता झाला नाही, ही गावाची शोकांतिका आहे,” असा संताप बागवस्ती व पोळवस्तीतील नागरिकांनी व्यक्त केला.



पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे व चिखल तयार होऊन ये-जा करणेही मुश्कील बनते. दरवर्षी काही ठिकाणी मुरूम टाकला जातो, मात्र पहिल्याच पावसात त्याची चिखलात होणारी अवस्था कायम राहते. वयोवृद्ध नागरिक, दुधगाड्या आणि शेतकरी यांना यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे की, आता तरी लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन हा रस्ता डांबरीकरण करावा व शेतकऱ्यांसह सर्व वस्त्यांना दिलासा द्यावा.