माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
दि.06 जुलै
:श्री दत्तात्रेय संस्थान दत्त शिखर,माहूरगड येथे श्री श्री श्री प. पु. १००८ महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाच्या मार्गदर्शनाखाली 03 ते 10 ऑगस्ट या कालावधीत नारळी पौर्णिमेनिमित्त परिक्रमा वेढा यात्रोत्सव साजरा केला जात आहे. तर, या यात्रेचे विशेष धार्मिक आकर्षण असलेला पंचक्रोशी परिक्रमा वेढा 08 ऑगस्ट रोजी निघणार असून, 09 रोजी रक्षाबंधन आहे. लाखोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी संस्थानच्यावतीने पुरेपूर सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली असून, 08 रोजी निघणाऱ्या परिक्रमा वेढ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी दुपारी 03 वाजेपर्यंत उपस्थित राहावे,
असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या यात्रेत अखंड दत्तनाम सप्ताहास दिनांक 03/08/2025 रविवार श्रावण शुक्लपक्ष नवमी 10 सकाळी 6:00 वाजता सुरुवात झाली असून,सप्ताह समाप्ती दि.10 रोजी होणार आहे. नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) परिक्रमा पंचकोशी वेढा यात्रा दिनांक 08/08/2025 रोज शुक्रवार दुपारी श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड येथून 04 वाजता निघणार असून,
दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 09 रोजी परत येणार आहे.ज्यांना कोणाला परिक्रमेला यायचे असेल त्यांनी दत्तशिखर येथे दुपारी 03 वाजता हजर राहावे, असे संस्थानकडून आवाहन करण्यात आले असून,श्रावण कृष्णपक्ष प्रतिपदा काकडा आरतीने या अखंड दत्त नाम सप्ताहाची सकाळी सहा वाजता (सूर्योदय) 10 रोजी समाप्ती होणार आहे.
परिक्रमा यात्रेचा मार्ग
सर्वतिर्थ येथून स्नान करून श्री दतात्रेय शिखर येथील दत्त प्रभुचे दर्शन घेऊन त्या ठिकाणावरून परिक्रमेला पुढीलप्रमाणे सुरुवात होईल. कमंडलू कुंड-काळेपाणी,
काळेश्वर महादेव,अनमाळ महादेव,सयामाता,गरुडगंगा, मोवाळ तळं,विष्णूकवी मठ (विश्रांती),झंपटनाथ कालभैरव,माहूर मारुती मंदिर, कपिलेश्वर मंदिर,सोनापीर, कवठापीर,पांडवलेणी, भिमतिर्थ, आनंद मठ पुरुषोत्तम भारती चंचल भारती (चहापाणी करीता),
बद्रिका आश्रम (देवदेवेश्वरीच्या खालील जुना वझरा रस्ता),
महादेव कैलास टेकडी (जुना कैलास पायथा),शेख फरीद, वझरा मारोती, ग्रामदेवता (दत्तमांजरी वाडा), अत्रीऋक्षी कुंड,अनुसया माता,सर्वतिर्थ आणि दत्तशिखर येथे परिक्रमेची समाप्ती होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत भाविकांनी शांततेत प्रभु श्री दत्तात्रेय स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच परिक्रमा वेढ्यात सहभागी होण्यासाठी वेळेआधीच गडावर उपस्थित राहावे व मंदिर संस्थानला सहकार्य करावे,असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.