घनसावंगी प्रतिनिधी : विजय कांबळे
जालना – सिटू संलग्न जालना जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे चौथे जिल्हा अधिवेशन रविवार, दि. ०७ रोजी संजय नगर येथील सिटू भवन येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शालेय कामगारांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अण्णा सावंत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कॉ. मधुकर मोकळे होते. यावेळी शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, सर्वात कमी मानधनावर काम करणाऱ्या या कामगारांमुळेच देशातील विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी झाले. तरीही हे कामगार कुपोषित होण्याची वेळ आली आहे, अशी टीका सावंत यांनी केली.
संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅड. अनिल मिसाळ यांनी गेल्या तीन वर्षांचा अहवाल सादर केला. शालेय कामगार हे देशाचे भविष्य घडवणारे असून, सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटित संघर्ष गरजेचा आहे, असे ते म्हणाले.

📌 अधिवेशनात पारित ठराव:
- शालेय कामगारांना किमान वेतन ₹२६,००० द्यावे.
- तामिळनाडूच्या धर्तीवर शालेय कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
- काम करताना आवश्यक साधनसामग्री, सुरक्षा साधने व विमा सुविधा उपलब्ध कराव्यात.
- कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युइटी व इतर सुविधा लागू कराव्यात.
अधिवेशनाचे सूत्रसंचालन बाबासाहेब पाटोळे यांनी केले. या वेळी शेषराव कान्हेरे, सुधाकर छडीदार, अशोक साळवे, गोविंद चांदगुडे, मीरा पुंगळे, चंपाबाई दाभाडे, लता वीर, सरस्वती मगर, नंदाबाई बनगया, प्रतिभा आहेर, सावित्री इस्थापे आदींसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
✍️ या अधिवेशनातून शालेय कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त झाला.