विटे, ता. 20 ( प्रदीप जोशी )
भाळवणी ता.खानापूर येथील घोल मळा रोडला असणाऱ्या शुभम धनवडे यांच्या विहिरीजवळ मृत अवस्थेतील बिबट्या आढळून आला आहे.
या बाबतची अधिक सविस्तर माहिती अशी की, येथील शेतकरी संभाजी धनवडे हे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी आले असताना त्यांना त्यांच्या विहिरी शेजारी झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला. बिबट्या पाहून घाबरलेल्या शेतकरी संभाजी धनवडे यांनी ग्रामस्थांना बोलावले. लोक जमा झाल्यावर आवाजाने बिबट्या जागचा हलत नाही हे पाहिल्यावर बिबट्या मृत असलेली खात्री लोकांना झाली.

वन विभागाने पाहणी करून साडे तीन वर्षे पूर्ण वाढ झालेला नार बिबट्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाळवणी ता.खानापूर येथे मृत अवस्थेत सापडलेला बिबट्या विट्यामध्ये आणण्यात आला असून शवविच्छेदन केल्यानंतरच बिबट्याचा कशाने मृत्यू झाला याचा उलगडा होईल असे वन अधिकारी फिरोज शिकलगार यांनी सांगितले. बिबट्याच्या अंगावर दोन- तीन ठिकाणी जखमा असल्याचे यावेळी निदर्शनास आले. साडेतीन वर्षे पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या आहे.
आकारमानाने खूप मोठा असणारा हा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
याबाबत वन विभागाला कळविण्यात आले आहे. हा परिसर पाण्याचा व ऊस शेतीचा आहे. येथे या पूर्वी देखील अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.