चिपळूण, ता. 24 एप्रिल 2025 — सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचगरी (ता. चिपळूण) येथे शासनाच्या 22 एप्रिल 2025 ते 1 मे 2025 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या जागतिक वसुंधरा दिन अभियानांतर्गत “आमची शक्ती आमचा ग्रह” या विषयावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याचा अवलंब करत विद्यालयात पर्यावरण जागृतीसाठी विशेष कार्यक्रम साजरे होत आहेत. या उपक्रमांचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक श्री. शिवाजी पाटील, श्री. अजय सूर्यवंशी, सौ. सुलोचना जगताप व सौ. राजश्री सावंत यांच्या सहकार्याने केले जात आहे.
या अभियानांतर्गत पाच वेगवेगळ्या विषयांवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार, दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी “भूमी” या विषयावर श्री. शिवाजी पाटील यांनी माहितीपूर्ण व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी मृदा संधारण, जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सप्ताहभर या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांसाठी श्रमदान, प्लास्टिक निर्मूलन, वक्तृत्व, निबंधलेखन, घोषवाक्य रचना, चित्रकला, 3R (Reduce, Reuse, Recycle) प्रयोग, तसेच ब्रीदवाक्य स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.