(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राज्य सरकारने अखेर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची लॉटरी प्रक्रिया आणि निवड थांबवण्यात आली होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी विधानसभेत सरकारला खडबडून जाग दिली. त्यांनी योजनेच्या स्थगितीबाबत प्रश्न उपस्थित करत, लॉटरी आणि लाभार्थी निवड तात्काळ सुरू करावी तसेच योजनेची अधिकृत वेबसाईट पुन्हा सुरू करावी, अशी ठाम मागणी केली.
“शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारी ही योजना त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा,” असे मत आमदार बाबर यांनी सभागृहात मांडले.
राज्य सरकारने यानंतर सकारात्मक भूमिका घेत, ही योजना पुनश्च सुरू करण्याची घोषणा केली आहे. लवकरच लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाईन पोर्टलवर सुरू केली जाणार आहे.
या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या स्वरूपात थेट मदत मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी ही योजना प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.