✍🏻 प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार
पुणे – “पुणे तिथे काय उणे” हे वाक्य पुन्हा एकदा खरे ठरवत नृत्यकलेत झळकू लागली आहे एक नवे नाव – अक्षरा कुलकर्णी. वय वर्षे फक्त १३, इंग्रजी माध्यमातून सातवीत शिकणारी ही हरहुन्नरी मुलगी आज नृत्यकलेच्या माध्यमातून आपले वेगळेपण सिद्ध करत आहे.
लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड असून मोबाईलच्या सहाय्याने तिने प्राथमिक धडे घेतले. पुढे तिने उंड्रीतील ट्रिनिटी डान्स क्लासेस मध्ये प्रवेश घेतला. सुप्रसिद्ध प्रशिक्षक टेरेन्स अँथनी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नुकतीच नृत्याची लेव्हल-2 पूर्ण केली व प्रशस्तीपत्रही मिळवले. तिच्या उत्साह, सर्जनशीलता आणि समर्पणाचा उल्लेख विशेषतः त्यात करण्यात आला आहे.
नृत्यकलेसोबत अभ्यासातही ती तितकेच मन लावून परिश्रम घेते. शाळेत व बाहेरील अनेक सांस्कृतिक स्पर्धा, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांमध्ये ती वैयक्तिक व समूह नृत्यात सहभागी होते. तिच्या नावावर आधीच अनेक प्रशस्तीपत्रे व पदके जमा झाली आहेत.
अक्षराच्या प्रगतीमागे तिचे शिक्षक, आई-वडील व आजी यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत ती स्वतःहून उत्साहाने सहभागी होते हे तिच्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे.
अक्षरा कुलकर्णी नृत्यकलेत नाव कमावण्याचा ध्यास घेत असून तिचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. आजच्या पिढीला पालक व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला तर कोणतेही ध्येय दूर नाही, याचे हे उत्तम उदाहरण आहे.