चास(नळी) – श्रीराम मित्र मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत यंदा अनोखा उपक्रम राबवला. अवाढव्य खर्च व डीजे मिरवणूक टाळून मंडळाच्या वतीने “डाळिंब व कांदा पिकांवरील अन्नद्रव्य व्यवस्थापन व स्ट्रेस मॅनेजमेंट” या विषयावर मार्गदर्शनपर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रख्यात कृषी तज्ज्ञ रत्न बी. टी. गोरे सर यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी डाळिंब व कांदा पिकातील विविध समस्या, अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व यावर प्रकाश टाकत शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.
प्रास्ताविकात ज्ञानेश्वर शिंदे यांनी गोरे सरांच्या संशोधनकार्याचा व पुरस्कारांचा आढावा घेतला. यावेळी प्रगतशील शेतकरी सोमनाथ चांदगुडे यांनी तरुण शेतकऱ्यांनी राजकारण वा इतर गोष्टींमध्ये वेळ न घालवता आधुनिक शेतीत विज्ञानाचा अंगीकार करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले.
सोमवार, दि. १ सप्टेंबर रोजी श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या या परिसंवादानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी निलेश अशोकराव चांदगुडे यांच्या श्रीराम फार्महाऊसवर गणेशाची आरती गोरे सर, सोमनाथ चांदगुडे व ज्ञानेश्वर पवार यांच्या शुभहस्ते पार पडली.