(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे)
खानापूर-विटा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरावडा” उपक्रमाचा प्रारंभ खानापूर-विटा तहसील कार्यालयामध्ये होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी, म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ पासून हा उपक्रम सुरू होऊन २ ऑक्टोबर २०२५, महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
👉 सेवा पंधरवड्यातील तीन टप्पे असे –
1️⃣ १७ ते २२ सप्टेंबर : पांदण रस्ते विषयक मोहीम
शेतकऱ्यांना शिवार रस्त्यांचा अडथळ्याविना वापर करता यावा यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण व अडथळे दूर केले जातील. रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची साफसफाई, शेतजमिनींची मोजणी व सीमांकनाची कामे केली जाणार आहेत.
2️⃣ २३ ते २७ सप्टेंबर : ‘सर्वांसाठी घर’ अभियान
पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी पट्टे वाटप, झोपडपट्टी पुनर्वसन, गायरान व शासकीय जमिनींचे नियमशीर वाटप, तसेच ग्रामीण भागात घरकुल मंजुरीचे वितरण करण्यात येईल.
3️⃣ २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : ‘नवीन उपक्रम’
या टप्प्यात पाणीसंवर्धन, जलसंपदा विकास, पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
तहसीलदार, खानापूर-विटा यांनी सांगितले की, “स्वच्छता, गृहनिर्माण, जमीन हक्क व पाणीसंवर्धन या क्षेत्रात ठोस परिणाम साधणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे.”