( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवसापासूनच वैभव पाटील मतदारसंघाच्या विविध विकास कामाबाबत सक्रिय झाल्याचे दिसून आले. काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा ना राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता त्यांची समक्ष भेट घेऊन खानापूर मतदारसंघात असणाऱ्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामकाजा संदर्भात मंत्री महोदयांची भेट घेऊन सदर सहाव्या टप्प्याच्या कामाबाबत विविध गोष्टींची मांडणी करून हा टप्पा पूर्णत्वास जाऊन या दुष्काळी पट्ट्यातील गावांना कशाप्रकारे कायमस्वरूपी पाणी मिळेल याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेताना परिसरातील शेतकरी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून काही सुधारणा असल्यास त्याही अमलात आणाव्यात व टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याविषयी पत्रव्यवहार केला. त्याचबरोबर भविष्यात पावसाळा सुरू होत आहे कृष्णा व वारणा नदीच्या काठी पूर परिस्थिती निर्माण होते
यावर उपाय म्हणून भविष्यात या परिसरात कार्यान्वित असणाऱ्या पाणी योजनांच्या साह्याने अधिकचे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडण्याविषयी आदेश द्यावीत अशी विनंती केली. जेणेकरून पूर परिस्थिती ही निर्माण होणार नाही आणि दुष्काळ भागातील लोकांच्या शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल त्याचबरोबरीने जमिनीतील पाणीसाठा ही वाढण्यास मदत होईल परिणामी उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या परिस्थितीत भूमी अंतर्गत पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल अशी ही मागणी करण्यात आली यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.