— मौनिबाबा आश्रमच्या अतिक्रमणाविरोधात निखिलकुमार गणेर यांचे आंदोलन निर्णायक
सावनेर (जि. नागपूर):
गुजरखेडी येथे मौनिबाबा आश्रमच्या अतिक्रमणाविरोधात मागील चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर यशस्वी ठरले. शेतजमिनीवरील हक्काच्या वाटेसाठी संघर्ष करणाऱ्या निखिलकुमार गणेर आणि त्यांच्या आईने पावसात भिजत उपोषण सुरू ठेवले आणि अखेर प्रशासनाला जाग येऊन कारवाईला सुरुवात झाली.
गुजरखेडी येथील तहसील कार्यालयासमोरील मौनिबाबा आश्रम क्षेत्रात 20 वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आश्रमाच्या वतीने शेतजमिनीकडे जाणाऱ्या सार्वजनिक मार्गावर पक्के अतिक्रमण करण्यात आले होते, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटला होता.
शेतजमिनी विकण्यास नकार — अतिक्रमणाचा पर्याय
शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यास स्पष्ट नकार दिला होता, त्यामुळे आश्रम व्यवस्थापनाने दबावाचे राजकारण करत बळजबरीने अतिक्रमणाचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात निखिलकुमार गणेर यांनी पुढाकार घेत सर्व शेतकऱ्यांना एकत्र केले आणि हक्कासाठी संघर्ष सुरू केला.
प्रशासनाला जाग आले — व्हिडिओ व्हायरलने खळबळ
चार दिवस चाललेल्या आंदोलनात निखिल आणि त्यांची आई पावसात भिजूनही ठामपणे उपोषणाला बसले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या दृश्यामुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि अखेर प्रशासनाने लक्ष देत सर्व संबंधित अधिकारी कामाला लागले.
“योजना केवळ कागदावरच” — शेतकऱ्यांचा रोष
शेतकऱ्यांनी राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांविरोधात नाराजी व्यक्त करत म्हटले की, “शेती तिथे रस्ता” हा मंत्र प्रत्यक्षात उतरला नाही. योजना केवळ भाषणांपुरत्या मर्यादित राहिल्या असून अंमलबजावणी अपुरी आहे, अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली.
पुढील आंदोलनाचा इशारा
निखिलकुमार गणेर यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आता प्रशासनाने योग्य पावले उचलली आहेत, मात्र यापुढे जर आम्हाला सहकार्य मिळाले नाही, तर पुढील आंदोलन थेट बावनकुळे साहेबांच्या घरासमोर केले जाईल.”