मोफत विजेसाठी सौर पॅनलला मिळणार अनुदान : लाभार्थ्यांचा वीज बिलाचा खर्च वाचणार
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकूल अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याबरोबरच मोफत विजेसाठी सौर पॅनलसाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे. जिल्ह्यातील मंजूर घरकुलावर सौर ऊर्जा पॅनेल बसणार आहे. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना वीज बिलांचा खर्च वाचणार आहे.
राज्यातील गरजू व गरिबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी शासनाने घरकूल योजना सुरु केली आहे. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती
आदिवासी न्याय महा अभियान योजना राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरता राज्य पुरस्कृत आवास योजना म्हणून राबवण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास प्रवर्गासाठी मादी आवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांचे दिलेले अनुदान तोकडे पडत होते. आता शासनाकडून घरकुलासाठी थेट 1 लाख 55 हजार रुपये, रोजगार हमी योजनेतून मजुरीचे 28 हजार 80 रुपये, शौचालयासाठी 12 हजार रुपये तसेच याव्यतिरिक्त प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून 15 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
सौर ऊर्जेचा वापर वाढणार…
गरजू लाभार्थ्यांना वीजेच्या भरमसाठ दरामुळे वीज बिले भरताना आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे शासनाने घरकूल लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या पॅनेलकरता अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरावर सौर पॅनेल बसणार असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार आहे. तसेच सौर ऊर्जेचा वाढता वापर करुन पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करुन पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.