( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
पारे गावच्या इतिहासात प्रथमच पावसाळ्या आधी दरगोबा तलाव भरला आहे. खानापूर तालुक्यातील निसर्गप्रेमींनी या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी पारे येथील दरगोबा तलावाला भेट देण्यास सुरवात केली आहे. निसर्गाने नटलेला आणि वरूण राजाची कृपा असलेला निसर्ग बघायचा असेल तर सहकुटुंब एक दिवस नक्की पारे येथे फिरायला गेले पाहिजे. जाताना जेवण न्यायला विसरता कामा नये.
परिसरात आपण फिरायला गेल्यानंतर हेमाडपंथी काळातील सुंदर असं देवी चिलाबाईचे मंदिर आणि डोंगराच्या अगदी वरच्या बाजूला दररोगाबाचे सुरेख असे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. जरा पूर्वेस आपणास देवी मीताबाईचं म्हणजे दरगोबाच्या बायकोचं सुंदर असं दुसरं मंदिर पाहायला मिळते. तसेच जरा पुढे गेलं गेलं की काळा कडा म्हणून आत मध्ये प्रसिद्ध असणारा डोंगराचे भाग आहेत. तिथे जाऊन आपण आपले प्रिय व्यक्तीचा आवाज दिल्यास आपल्याला तो आवाज डोंगराच्या माध्यमातून दोन वेळा इको साउंड मधून ऐकायला मिळतो.


तसेच जरासं पुढे गेलो तर आपणाला पुरातन काळातील एक गाव व त्याचे अवशेष पाहायला मिळतील त्या गावाला कासारवाडी असं जुनं नाव आहे तिथे गेल्यानंतर आपणाला जुन्या घराचे अवशेष चुली छोटी छोटी गाडगी बोळकी बांगड्या बघायला मिळतात. आणखी थोडंसं पुढे गेलो की आपणास मोत्याचे माळ नावाचा डोंगरांचा कडांचा भाग दिसतो. याचे विशेष म्हणजे सात आठ डोंगर यांचे कडे बाहेर आलेले आहेत. ते मोत्याच्या माळेसारखे दिसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं असंख्य अशी वन औषधी झाडे सुद्धा आहेत. अगदी आपण न बघितलेली झाड या परिसरात बघायला मिळतात. बिब्बा करवंद अर्जुन सारखं झाडे आढळतात. स्टार नावाचे जे आंबट गोड फळ असतं त्याची झाडे आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. साप कांदा असेल शेंगोळ असेल सीताफळाची झाडे असतील जांभळाची झाड असतील बेलाची झाड असतील. जवळजवळ 400 प्रकारची झाड या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात.
तसेच रेवणसिद्ध मंदिर ते दरोगोबा मंदिर असा सुंदर असा डांबरी रस्ता सुद्धा आहे. या मार्गाने सुद्धा आपण येऊ शकता. इथे झाड आणि तलाव व मंदिर असल्यामुळे त्या परिसरात वेगवेगळी पक्षी सुद्धा या परिसरात येतात पक्षीप्रेमीनी या गोष्टीची नोंद घ्यावी. येथे बोटिंगची देखील सुविधा आहे.