उरण (प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे) : काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या आणि दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रुती म्हात्रे यांनी आजवर काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने केलेल्या कामाची ही पावती असून, पक्ष नेतृत्वाने त्यांच्या प्रामाणिक योगदानाची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. महिलांच्या हक्कांसाठी सतत आवाज उठवणाऱ्या, समाजातील दुर्बल घटकांसाठी लढणाऱ्या आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहणाऱ्या श्रुती म्हात्रे यांचे संघटन कौशल्य, जनसंपर्क व तळागाळाशी असलेली जवळीक पक्षासाठी उपयुक्त ठरणार आहे. निवडीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, समन्वयक गणेश पाटील व ज्येष्ठ नेते आर.सी.भाई घरत यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे आभार मानले. “ही निवड माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. माझे वडील ज्या पदावर होते, त्याच पदावर काम करण्याची संधी मला मिळाल्याने मी अधिक जबाबदारीने कार्य करेन,” असे श्रुती म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन होत आहे.