जळगाव : सध्याचं युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ए.आय.चं आहे. प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात एआयचा वापर करतोच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक शिकवा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते आसोदा येथील थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दै. तरुण भारत व सातपुडा इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर भैरवी पलांडे-वाघ, दै. ‘तरुण भारत’चे संपादक चंद्रशेखर जोशी, शाखा व्यवस्थापक भावना शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, शेखर पाटील, जिल्हा परिषदेच्या विधी अधिकारी ॲड. सुरेखा पाटील, सातपुडा इन्फोटेक प्रा. लि.चे चेअरमन रितेश पाटील, डॉ. हर्षल कोतवाल टेक्निकल डायरेक्टर, कंपनीच्या सरव्यवस्थापक दीपा अग्निहोत्री, ट्रेनिंग डायरेक्टर रुची भाटिया, चेतन राजपूत, सुनील विसपुते, प्रदीप मिस्त्री, प्रशांत सपके, जिल्हा फ्रान्चिसी सविता बाविस्कर, जळगाव तालुका फ्रानचिस चंचल भाटिया आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सातपुडा इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका आकांक्षा झोपे यांनी केले. त्यांनी कंपनी स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या सभोवताली विज्ञान आहे. त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. त्यातून त्याला नवीन संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळावं, हा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना ए.आय., रोबोटिक्स, नॅनो टेक्नोलॉजी, आदी विषयांचं उत्तम प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणजे ही रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅब. भारतातील ही पहिलीच लॅब असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या वेळी पुढे बोलताना, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आसोदा येथील थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू झालेली देशातील पहिली रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचा उपक्रम स्तुत्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, अशा लॅब प्रत्येक शाळेत असल्या पाहिजेत. या लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. शाळांमध्ये आता आशा प्रकारच्या लॅब निर्माण होत आहेत. यातून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल. शाळेत विज्ञानाच्या लॅबसह ए.आय. ऑटोमिशन, ऑटोमोबाइलसारख्या लॅबही असल्या पाहिजेत. थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अशा प्रकारची लॅब आहे, याचा आनंद आहे. ज्या शाळेत अशा लॅब नसतील त्यांनी मला संपर्क करावा. त्यांना लॅब स्थापन करण्यासाठी प्रशासन मदत करेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
ज्या शाळांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी पुढील 15 दिवसात त्यांच्या शाळांचे प्रस्ताव सातपुडा इन्फोटेक प्रा. लि. कंपनीच्या जळगाव कार्यालयात दाखल करावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
यावेळी थेपडे स्कूलच्या फ्रान्चिची जयश्री प्रफुल बागरेचा यांचा एक महिला स्वयंरोजगार निर्माण करणारी नारी शक्ती म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्कार करून महिलांच्या स्वयंरोजगाराबाबत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.